सर्वोत्कृष्ट चित्रपट
तेंडुलकर आऊट,
सर्वोत्कृष्ट नाटक डू अँड मी,
सर्वोत्कृष्ट पुनरूज्जीवित
नाटक व्यक्ती आणि वल्ली
धम्माल विनोदी परफॉर्मन्सेस, आकर्षक
नृत्याविष्कार आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीने झी टॉकीज कॉमेडी
अवॉर्ड्सचा पहिलावहिला सोहळा रंगला. चित्रपट, नाट्य आणि
विशेष पुरस्कार प्रदान करत प्रेक्षकांचे रंजन करणाऱ्या कलाकारांचा सन्मान यावेळी
करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘तेंडुलकर
आऊट’ने पटकावला तर ‘डू अँड मी’ हे नाटक सर्वोत्कृष्ट नाटक
ठरले. सर्वोत्कृष्ट पुनरूज्जीवित नाटकाचा पुरस्कार ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकाला प्रदान करण्यात
आला.
कलाक्षेत्रात विनोदाकडे नेहमीच दुर्लक्ष होते, मानवी
आयुष्याला समृध्द करणाऱ्या विनोदाला आपल्या कलेतून प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या,
प्रेक्षकांना खळखळुन हसविणाऱ्या कलाकारांचा सन्मान झी टॉकीज
वाहिनीतर्फे झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स देऊन शुक्रवारी करण्यात आला.
चित्रपट विभागात ‘तेंडुलकर आऊट’ सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला
तर चित्रपटाचे दिग्दर्शक स्वप्ननील जयकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या
पुरस्काराने गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार टाइमपास या
चित्रपटासाठी रवी जाधव आणि प्रियदर्शन जाधव यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट
अभिनेत्याचा पुरस्कार प्रथमेश परब (टाइमपास) याने पटकावला तर निर्मिती सावंत
(कुमारी गंगूबाई नॉन-मॅट्रिक) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या.
नाटक विभागात डू अँड मी सर्वोत्कृष्ट नाटक ठरले
तर श्रीरंग गोडबोले आणि विभावरी देशपांडे यांना याच नाटकासाठी सर्वोत्कृष्ट
दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. वंदे मातरम्-अर्थात गोंधळ मांडियेला या नाटकाच्या
संहितेसाठी सुनील माने यांना गौरविण्यात आले. पडद्याआडमधील भूमिकेसाठी पंढरीनाथ
कांबळे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता तर राधिका इंगळे यांना डू अँड मी नाटकासाठी सर्वोत्कृष्ट
अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.
पुनरूज्जीवित नाटक विभागात व्यक्ती आणि वल्ली सर्वोत्कृष्ट
ठरले. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक विजय केंकरे यांना घोळात घोळ या
नाटकासाठी मिळाले. तर आपल्या चतुरस्र अभिनयाने हसवा फसवी हे नाटक गाजविणाऱ्या
पुष्कर श्रोत्री यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि याच नाटकासाठी वैखरी भजन यांना
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आपल्या कारकीर्दीत प्रेक्षकांना भरभरून आनंद देणारे ज्येष्ठ
रंगकर्मी आत्माराम भेंडे यांना लाइफटाइम अचीव्हमेंट अवॉर्ड नुकताच पुण्यातील
त्यांच्या राहत्या घरी जाऊन प्रदान करण्यात आला. तर लोककलेतील पोवाड्याला एका
वेगळ्याच उंचीवर नेणाऱ्या शाहीर साबळे आणि आपल्या तिरकस, उपरोधिक
पण अंतर्मुख करायला लावणाऱ्या कवितांनी हास्यकाव्य समृध्द करणाऱ्या अशोक नायगावकर
यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हास्य-विनोदाचा जल्लोष असलेल्या या रंगतदार सोहळ्याचे
सूत्रसंचालन मकरंद अनासपुरे आणि स्वप्नील जोशी यांनी केले. रंगभूमीपासून
मराठी आणि हिंदी चित्रपटांत आपली एक वेगळीच छाप पाडणारा सर्वांचे लाडके
अभिनेते अभिनेता दिवंगत
लक्ष्मीकांत बेर्डे आणि विनोदी चित्रपटाचे युगप्रवर्तक दादा
कोंडके यांना यावेळी अनोख्या
स्वरुपात श्रध्दांजली वाहण्यात आली. अभिनेता सिध्दार्थ जाधव यांनी बेर्डे आणि कोंडके यांच्या गाण्यावर नृत्य
सादर करुन सर्वांची मने जिंकली. कॉमेडी अवॉर्ड्स आणखी खुसखुशीत बनवले ते वैभव
मांगले यांच्या महाभारताचा आत्ताच्या आताच्या काळाशी संदर्भ
जोडणाऱ्या सादरीकरणाने. प्रेक्षकांनी हशा आणि
टाळ्यांनी या सादरीकरणाला भरभरून दाद दिली. आगामी प्यारवाली लव्ह स्टोरी
चित्रपटातील गाण्यांवर स्वप्नीलजोशी, ऊर्मिला
कानेटकर-कोठारे यांनी नृत्य सादर केले. उमेश जाधव, फुलवा
खामकर, स्वरुप आणि सॅड्रीक या कोरिओग्राफर्सच्या नृत्य रचनांनी
प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले तर
मानसी नाईक आणि अमृता खानविलकर या अभिनेत्रींच्या दिलखेचक पदन्यासाने सर्वांची मने
जिंकली. केवळ विनोद,
हास्य आणि जल्लोष असलेल्या या अवॉर्ड्सनी चित्रपटसृष्टीतील विनोदी
कलाकारांना एक वेगळीच ऊर्जा दिली.
इतर पुरस्कार
चित्रपट विभाग
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेताः केतन पवार (पोपट), पंढरीनाथ
कांबळे (कुमारी गंगूबाई
नॉनमॅट्रिक)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीः नीलम शिर्के (तेंडुलकर
आऊट)
नाटक विभाग
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेताः अमित बेंद्रे (अजब लग्नाची
गजब गोष्ट)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीः स्नेहल देशमुख (पडद्याआड)
No comments:
Post a Comment